खरंच आपण माणसं सर्वश्रेष्ठ आहोत?
माणसं पैशाने, कष्टानं
केलेली मदत तर
विसरतोच पण कोणी जीव वाचवला असेल
तर
ते ही विसरायला कमी करत नाही.
फेसबुकवर एक अप्रतिम व्हिडिओ
बघितला आणि अवाक झाले. त्यात एका वृद्ध कोळ्याच्या आणि एका पेंगूइन च्या मैत्रीची अनोखी गोष्ट होती. गोष्ट आहे ब्राझील मधली रिओ द जनेरो
शहरातील! तिथं समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका कोळ्याला एक दिवस एक छोटा पेंगूइन सापडला. तो तेलाने
पूर्ण माखलेला होता आणि कदाचित त्यामुळे त्याला पाण्यात अडचण येत होती. आता
भूगोलाच्या दृष्टीनं विचार केला तर पेंग्विन च्या
सगळ्या कॉलनी किंवा वस्ती ही अगदी थंड, बर्फाळ
प्रदेशातील, म्हणजेच अंटार्क्टिका मधील आणि ब्राझील कुठल्या कुठे
दक्षिण अमेरिकेत साधारण 5000 मैल अंतरावर !! तो बिचारा एकटा पेंग्विन तिथे
आलाच कसा हा एक प्रश्नच पण काही कारणाने, अपघाताने
तो तिथे पोचला आणि या माणसाच्या हाती लागला.
त्याने त्याला स्वतःच्या घरी
आणलं, तेल वगैरे धुवून काढलं, अगदी
छान अंघोळ घालून स्वच्छ केलं आणि त्या भुकेल्या जीवाला खाउपिऊ घालून त्याची काळजी
घेतली. पण त्याच्या थव्याशिवाय तो एकटा जगणार कसा या
विचाराने त्या कोळ्याने त्याला परत समुद्रात सोडण्याचा निर्णय घेतला, पण ते
पिल्लू काही याला सोडून जायला जाम तयार होईना, असे साधारण
6 ते 8 महिने गेले, तोपर्यंत
त्या माणसाने अतिशय प्रेमाने त्याचा सांभाळ केला आणि एक
दिवस ते पिल्लू समुद्रात निघून गेले. इथपर्यंतही ठीक
आहे पण खरी गोष्ट तर पुढे आहे. या घटनेला ५ वर्षं
होऊन गेली पण दर काही महिन्यांनी हा पेंग्विन त्या
कोळ्याला भेटायला नक्की येतो, त्याला अगदी गळामिठी घालून प्रेमाने
भेटतो. त्याच्या नाकाला नाक लावून त्याचे लाड
करतो. स्वतःचे लाड करून घेतो आणि पुन्हा निघून जातो. तो
वयोवृद्ध माणूसही मुलाचे किंवा खरं तर नातवाचे लाड करावे असे त्या पेंग्विनचे
मनापासून लाड करतो. त्या दोघांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव अगदी बघण्यासारखे
होते. ती क्लिप इथेच संपते आणि प्रश्न सुरू होतात. एक
पक्षी जो कधीही मानवी वस्तीत, माणसाच्या
संपर्कात राहत नाही त्याचे त्या कोळ्याशी इतके दृढ आणि तितकेच नाजूक ऋणानुबंध का
आणि कसे जुळावेत? बरं जेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्याचा जीव त्यानं वाचवला तेव्हा ते उपकार स्मरून तो कदाचित त्याला लवकर
सोडून जायला तयार झाला नाही पण इतक्या प्रचंड दूर अंतरावरून एखादया नातेवाईकाला
भेटायला यावं तसं हा दर काही महिन्यांनी येतो, याचं
आपल्याकडे काय तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे?
मला एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे
या जगातील प्रत्येक सजीव, मग तो प्राणी, पक्षी, वनस्पती, माणूस
कोणीही असो, प्रेमाचा भुकेला असतो आणि प्रेम मिळालं की परतफेड
म्हणून प्रेमच देण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते. (माणूस नावाचा कृतघ्न प्राणी याला अपवाद आहे.) आपण
सगळ्या जीव सृष्टीत माणूस सगळ्यात उत्क्रांत असं मानतो. मन, मेंदू, भावना या सगळया बाबतीत इतर
प्राण्यांपेक्षा माणूस खूपच वरचढ आहे असं अभिमानानं म्हणतो. आपल्या
स्मरणशक्तीला तोड नाही असं तर आपलं कायमच म्हणणं असतं, मग हे
जे काही आहे ते काय आहे? हसणं, रडणं आणि
महत्वाचं म्हणजे बोलता येणं ह्या माणसाला मिळालेल्या, विशेषतः
संवादच्या दृष्टीनं मिळालेल्या किती मोठया
देणग्या आहेत पण यातलं त्या पक्ष्यांकडे काहीच नाही तरीही तो हे सगळं कसं व्यक्त
करतो? इथेच महत्वाची असते डोळ्यांची आणि स्पर्शाची भाषा! त्याला
देश, काळ, वय, बोलीभाषा
या कशाचंही बंधन नाही. त्या माणसाने ज्या मायेच्या स्पर्शाने त्याला जीवदान दिलं
ते तो मुका प्राणी अजून विसरू शकला नाही. त्याच्या नजरेतील, स्पर्शातील
प्रेम त्याला वारंवार त्या कोळ्याकडे इतकं अंतर पार करून यायला भाग पाडते. तो
इतकासा जीव, त्याचा तो छोटासा मेंदू पण किमया कशी बघा आणि या
पार्श्वभूमीवर माणसाची माणसाशी वागणूक बघा ! मग प्रश्न पडतो
खरंच आपण सर्वात श्रेष्ठ आहोत? उत्क्रांत
आहोत? मुळात आपण माणुसकीने वागणारी माणसं राहिलो आहोत की या प्राणी, पक्षी
यांच्याकडून काही शिकायची गरज आहे?
Comments
Post a Comment